कावळे होते ते उडाले, अभिमान वाटतोय राष्ट्रवादीच्या सच्चा मावळ्यांचा - धनंजय मुंडे
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड जिल्ह्यांतील पाच विधानसभा मतदारसंघांमधील उमेदवारांची यादी जाहीर केली. ते बीड येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे, बीड मतदारसंघातून संदीप क्षीरसागर, गेवराईतून विजयसिंह पंडीत, माजलगावमधून प्रकाश सोळंकी आणि केजमधून नमिता मुंदडा यांच्या उमेदवारीवर पवार साहेबांनी शिक्कामोर्तब केले आहे.
दरम्यान, धनंजय मुंडे म्हणाले आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीत बीडमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जी भावनिक साद दिली त्यामुळे मला दहा हत्तींचे बळ मिळाले आहे. जे कावळे होते ते उडाले… अभिमान वाटतोय माझ्या या राष्ट्रवादीच्या सच्चा मावळ्यांचा जे आजही पवार साहेबांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहेत.
मुंडे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात शेतकऱ्यांबाबत जे स्थान होते तेच आदरणीय पवार साहेबांच्या मनात आहे. गेली ५५ वर्षे राज्यातील शेतकऱ्यांची, गोर-गरिब जनतेची साहेबांनी सेवा केली, त्यांच्या सुख-दुखात सहभागी झाले. कोणीच वंचित राहू नये यासाठी त्यांनी १८ पगड जातींना मान दिला. बाबासाहेबांची समता खऱ्या अर्थाने जर कोणी प्रस्थापित केली असेल तर ती म्हणजे आदरणीय साहेबांनी केली.
भाजपच्या मेगाभरतीमुळे पक्ष दुभंगून गेला आहे. त्यामुळे कोणी रुसून जात आहे तर कोणी फुगून जात आहे. उरलेले नेते महाजनादेश यात्रेच्या बस वर चढत आहेत. बीड जिल्हा कुणाचा मिंदा नाही, बारामती प्रमाणेच साहेबांनी आपल्याला भरभरून प्रेम दिलंय. आता तुमची वेळ आहे, साहेबांवर प्रेम दाखवायची असे आवाहन त्यांनी उपस्थित नागरिकांना केले.